सिल्लोड, (प्रतिनिधी) : जालना - जळगाव या १७४ किलोमीटर बहुचर्चित प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी रेल्वेकडून भूसंपादनाची प्रक्रिया थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या अनुषंगाने सोमवारी (दि. १५) उपविभागीय कार्यालयात सुनावणी होती.
सुनावणीदरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध करीत गोंधळ घातला. यामुळे सुनावणी प्रक्रिया बंद पडली. जालना जळगाव १७४ किमी
लांबीच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाची भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरु आहे.
या भूसंपादन प्रक्रियेवर सिल्लोड शहरासह तालुक्यातील भवन, पालीद, मंगरूळ, खेडी लिहा, वरूड येथील काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. सदर रेल्वे मार्ग भवन, सिल्लोड शहरातून न घेता छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गाच्या पूर्वेकडून घ्यावा, अशी मागणी काही शेतकऱ्यांची आहे.
सोमवारी पुन्हा सुनावणी :
सुनावणी दरम्यान गोंधळ झाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा वेळ मागितल्याने सुनावणी प्रक्रिया ठप्प झाली. सुनावणी आठवडाभर पुढे ढकलण्यात आली. आता पुढील सुनावणी पुढील सोमवारी (दि. २२) होणार आहे. पुढील सुनावणीत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. यानंतर अहवाल वरिष्ठांना पाठवला जाणार अशी माहिती प्रशासनाने दिली. पठाण नगरपरिषदेचे अभियंता जयश्री दीपक उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी लतीफ मुख्याधिकारी कारभारी दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुनावणीदरम्यान शंभराहून अधिक शेतकरी दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केला व गदारोळ झाला. यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयाबाहेर तासभर धरणे आंदोलन केले.













